हिंगोली : शहरातील विविध भागात अनेक वृद्ध एकटे राहत असल्याचे समोर आले आहे. अशा एकट्याने जीवन जगणाऱ्या किंवा सहारा नसलेल्या वृद्धांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना काळात तर या वृद्धांचे चांगलेच हाल झाले. अशा एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध नागरिकांची नोंद घेणे अपेक्षित आहे. राज्यभरात एकट्या राहणाऱ्या नागरिकांवर अत्याचार, त्यांना त्रास देण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकट्या राहणाऱ्या वृद्ध नागरिकांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केल्यास त्यांना सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होते. येथील हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात अशा ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदीच नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा, त्यांना सुकर जीवन जगता यावे, यासाठी शासन स्तरावरून अनेक उपक्रम राबविले जातात. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोना काळात एकट्याने राहणाऱ्या वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही सामाजिक, संस्था संघटनांनी मदत करण्याचा प्रयत्न केला.
औषधे आणण्याचीही सोय नाही
अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. त्यामुळे त्यांना घरी एकटेच राहावे लागते. अशा वेळी औषध आणण्यासाठी वृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाणे
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात वृद्ध नागरिकांची नोंद नसल्याची माहिती मिळाली. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेऊन घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे
हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीत शहराजवळील वस्तीचा भाग येतो. हद्दीत नियमित गस्त असली तरी एकटे राहणाऱ्या नागरिकांची नोंद उपलब्ध नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेतल्या जातात.
आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही !
मागील काही दिवसांपासून मी एकटा राहतो. मात्र पोलिसांकडून एकदाही विचारणा झाली नाही. पोलिसांची गाडी मात्र नियमित या भागात येऊन जाते. त्यामुळेच थोडासा दिलासा मिळत असल्याचे एका वृद्ध नागरिकांनी सांगितले.
कोरोना काळात एकटाच घरात राहत होतो. या काळात कोणताही राजकीय पुढारी अथवा पोलीस आमच्या भागाकडे फिरकला नाही. पोलिसांनी एकट्या राहणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन अधून-मधून विचारपूस केल्यास वृद्ध नागरिकांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रीया एका वृद्ध नागरिकाने दिली.