सेनगाव (हिंगोली ) : ‘‘हिच माझी आस जन्मों-जन्मी होवो तुझा दास, ‘पंढरीचा वारकरी’ वारी चुको नेदी हरी’’ या संत वचनाप्रमाणे...समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांचा पंढरपूर पायदळवारी सोहळा मंगळवारी सकाळी ७:०० वाजता तालुक्यातील सेनगाव पानकनेरगाव मागार्ने मराठवाड्यात दाखल झाला. पालखीचे सेनगाव -रिसोड रस्त्यावर विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.
शेगावनिवासी समर्थ श्री गजानन महाराज यांनी आजन्म पंढरीची वारी केली. तीच वारीची परंपरा पालखी रूपाने आजही सुरु आहे. गज, अश्व, पताका, अब्दागिरी, शिस्तबद्ध टाळकरी, गाणगंधर्व अशी गाणारी महाराज मंडळी असा पालखीचा राजवैभवी थाट पूर्वपरंपरागतच आहे. यंदा ५२ व्या वर्षी पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाची आस घेवून निघालेल्या पालखीचे मंगळवारी सेनगाव तालुक्यात सकाळी ७ वाजता पानकनेरगाव मार्गे आगमन झाले. सातशे भाविकांचा सहभाग असलेल्या श्रींच्या पालखीचे भाविक व प्रशासनाने जोरदार स्वागत केले. गण..गणात..बोते..चा जयघोष करीत मराठवाडा व विदर्भ सीमेवर परिसरातील वाढोणा, खैरखेडा, सातपट्टा, पानकनेरगाव येथील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, फौजदार बाबूराव जाधव, शिवाजी मुटकुळे, अॅड.अमोल जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष देवकर, पानकनेरगावचे सरपंच झुंगरे, अंनता देशमुख, ह.भ.प.पंकज महाराज देशमुख आदींनी स्वागत केले.