लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील श्री क्षेत्र नर्सी या संत नामदेवाच्या जन्म ठिकाणी आद्य संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ७४८ वा जयंती महोत्सव सोहळा १९ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीला भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी सकाळी ६.३५ वाजता संत नामदेव महाराज यांच्या जन्म सोहळ्याची सुरूवात झाली. रामरतन शिंदे यांनी सपत्नीक ‘श्री’ची महापूजा केली. यावेळी दत्तराव वरणे, गजानन थोरात, भिकाजी कीर्तनकार, बळीराम सोळंके, संजय उफाड व भाविक भक्तांची उपस्थिती होती.दरम्यान, मागील सात दिवसांपासून श्री संत नामदेव महाराज मंदिर परिसरामध्ये दररोज काकडा, भजन, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिजागर व दररोज नामवंत कीर्तनकारांचीे कीर्तने व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले होते.सोमवारी कार्तिक एकादशीच्या दिवशी जन्म सोहळ्याला सकाळी भल्या पहाटे भाविकांनी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसरामध्ये श्री संत नामदेवाच्या प्रतिमेची व नावाची झेंडूच्या फुलांनी आकर्षक रांगोळी रेखाटल्या होत्या. तसेच मंदिर सजावट व पणत्या पेटविल्या होत्या. दुपारी एक वाजता ‘श्री’ंची पालखीतून नगर प्रदक्षिणा निघाली. सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी हभप रमेश महाराज मगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
संत नामदेव जन्मोत्सव नर्सीत उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:22 AM