हिंगोली : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाने हिंगोली येथे २०१९ मध्ये ‘सखी वन स्टॉप’ सेंटर सुरू केले. वर्षभरात या केंद्राने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ६१ प्रकरणांचा विचार करून पीडित महिलांना समुपदेशन करून त्यांना न्याय मिळवून दिला.
मागील वर्षभरात जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या पाच तालुक्यांतर्गत जून २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाअंतर्गत पाचही तालुक्यांतून तक्रारी ‘सखी वन स्टॉप सेंटर’कडे आल्या होत्या. सेंटरच्या केंद्र प्रशासक अर्चना वानखडे, विधी सल्लागार ॲड. मंगल भोजनकर, समुपदेशक दिनेश पाटील आदींनी जिल्हा महिला बाल विकास कार्यालयात पीडित महिलांचे अर्ज दाखल केले. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रैमासिक बैठक घेऊन उपस्थित पीडित महिलांचे समुपदेशन करून जवळपास ६१ अर्जांचा निपटारा केला. गत वर्षभरात कौटुंबिक ५५, अपहरण १, बाललैंगिक ३, अत्याचार १, इतर १ त्यापैकी समुपदेशन ३१, विधी १५, आरोग्य ३, निवास ११, पोलीस सहायता १ अशा स्वरूपाच्या तक्रारी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ‘सखी वन स्टॉप सेंटर’ने निकाली लावल्या. या संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा, जिल्हा महिला बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ६१ महिलांच्या प्रकरणांचा विचार करून ते प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. गत वर्षभरात हिंगोली, वसमत या दोन तालुक्यांतून पीडित महिलांच्या तक्रारी ‘सखी वन स्टॉप’ सेंटर हिंगोलीकडे प्राप्त झाल्या होत्या.
सहा प्रकारांची केली जाते मदत
‘सखी वन स्टॉप’ सेंटरमार्फत पीडित महिलांना सहा प्रकारांची मदत केली जाते. यामध्ये कायदेशीर मदत, पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय मदत, आश्रय, व्हिडिओ कॉन्फरन्स, पोलीस सहायता आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर त्याही समुपदेशनाने सोडविल्या जातात.
फोटो आहे