रमेश वाबळे, हिगोली : खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनासाठीचे खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेत किंवा कोअर बॅंकिंग असलेल्या अन्य बॅंकेत उघडण्याचे स्वातंत्र्य विभागीय उपसंचालकांनी दिले आहे; परंतु, ते आदेश न जुमानता वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक (माध्यमिक) कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. यावरून २३ फेब्रुवारी रोजी शिक्षकांनी संताप व्यक्त करीत या कार्यालयात ठिय्या मांडला होता.
खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून होते. परंतु, या बॅंकेमार्फत राष्ट्रीय बॅंकेच्या तुलनेत अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडण्याची परवानगी देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे होत होती. त्यानुसार विभागीय उपसंचालकांनी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेत किंवा कोअर बॅंकिंग असलेल्या अन्य बॅंकेत उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार माध्यमिक शिक्षक विभागानेही आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. मात्र, वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक (माध्यमिक) कार्यालय यात खोडा घालत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. वारंवार निवेदने, विनंती करूनही कार्यालयाकडून टोलवाटोलवीच करण्यात येत असल्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी रोष व्यक्त करीत या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला.
दरम्यान, या कार्यालयाचे अधीक्षक राम लांडे यांनी सोमवारपर्यंत शिक्षकांचा प्रश्न निकाली काढू असे, भ्रमणध्वनीवरून सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत शिक्षकांचे समाधान झाले नव्हते. जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कार्यालयातच बसून राहू, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला होता. यावेळी जवळपास ३५ ते ४० शिक्षक उपस्थित होते.