हिंगोली : कोरोनामुळे एसटी बसेस बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्न घटले आहे. मागील थकबाकी वसुलीतून आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार झाले. मालवाहतुकीतून थोडे उत्पन्न हाती येत असले तरी, येणाऱ्या रकमेतून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे? याची चिंता एसटी महामंडळाला लागली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने काही बाबींवर कडक निर्बंध घातले आहेत. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यात एसटी महामंडळाने बसेस ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून महामंडळाला काही नफा मिळत असतो. मात्र काही दिवसांपासून एसटीची चाके थांबलेली असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या एसटी महामंडळाने मालवाहतुकीसाठी बसेस सोडल्या आहेत. मात्र कोरोनामुळे मालवाहतुकीलाही म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या रकमेवरच एसटी महामंडळाला समाधान मानावे लागत आहे. मात्र यातून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करणे शक्य नाही.
...तर पगार होणे अवघड
हिंगोली एसटी आगाराची इतर विभागाकडे असलेली मागील थकबाकी वसूल झाली आहे. आता केवळ बेस्ट व मानव विकास मिशनकडे काही थकबाकी असल्याची चर्चा आहे. ही रक्कम वसूल झाली तरी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरली जाईल की नाही, हे सध्यातरी सांगणे अवघड आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न सध्या कमी झाले आहे. मात्र कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर एसटी बसेस पुन्हा धावतील. पगार रखडल्यास अडचणी येतीलच.
- डी. आर. दराडे, विभागीय सचिव कामगार सेना,
कोरोनामुळे एसटी बसेस बंद असल्या तरी आतापर्यंत पगाराची अडचण निर्माण झाली नाही. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा बस सुरू होतील. त्यामुळे पगाराची अडचणही दूर होईल.
-शेख इस्माईल, हिंगोली आगार
हिंगोली आगारातील बसेस-५७ एकूण कर्मचारी -३१३
सध्याचे अंदाजे रोजचे उत्पन्न - २५,०००
महिन्याला पगारावर होणारा खर्च - ७० लाख
हिंगोली आगारातील कर्मचारी संख्या
चालक - १२३
वाहक - १२१
- मेकॅनिकल - ३८
प्रशासकीय कर्मचारी - ३१