रमेश कदम
आखाडा बाळापूर : नदी, नाल्याच्या काठाकाठाने निसर्गाचा आस्वाद घेत थकेपर्यंत भटकंती करत दिवस घालणाऱ्या तरुणाला आपल्या आवडीपायी रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. नदीकाठच्या झाडांवरील मधमाश्यांच्या पोळ्यांची विक्री करून रोजगाराची नवी पायवाट त्याने शोधली आहे. भटकंतीची आवड आणि रोजंदारीची किंमत या दोन्ही गोष्टी त्याला मिळत आहेत. नांदेड-हिंगोली रोडवरील त्याच्या हातातील मधमाश्यांच्या 'पोळ्यांचे झुंबर' प्रवास करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत आहे.
नांदेड-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापूर ते कुर्तडी पाटी यादरम्यान कुठेतरी एक तरुण मधमाश्यांच्या पोळ्यांचे झुंबर घेऊन रस्त्यावर उभा ठाकलेला दिसतो. सद्य:स्थितीत शुद्ध, गावरान वस्तू मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्यात मधाचंं पोळं आणि मधाचा रस शुद्ध स्वरूपात मिळणे, हे तर अवघडंच. कारण, व्यापारपेठेत मिळणाऱ्या मधाच्या बाटल्यांमध्ये शुद्ध स्वरूपात मध मिळत नाही. या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या तरुणाच्या मधमाश्यांच्या पोळ्यांचे झुंबर आकर्षित करते. प्रवासी थांबतात आणि त्यांच्याकडून मधाच्या पोळ्यांची खरेदी करतात. कुणी मधाचे पोळे जशास तसे खरेदी करून घेऊन जातो, तर काही जण त्यातला मध काढून घेऊन जातात. या रस्त्यावरील हा मध विकणारा तरुण प्रवाशांसाठी सवयीचा झालाय आणि आकर्षणाचा केंद्रही झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील नरेंद्र रामजी बुरकुले हा तरुण या रस्त्यावर मधमाश्यांच्या पोळीविक्रीचा व्यवसाय करतो. प्रवाशांना शुद्ध स्वरूपातला गोड मध १०० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देतो. मधाचे पोळं जमा करायचे आणि रस्त्यावर उभे ठाकले की, काही क्षणांतच त्याची विक्री होत असल्याने त्याच्या रोजगाराची नवी पायवाट त्याला सापडली आहे. आता तो दररोज कयाधू नदीच्या काठाने फिरतो. परिसरातील नाल्यांच्या काठावरील विविध झाडांवरील मधमाश्यांचे पोळे गोळा करतो आणि रस्त्यावर उभे राहून त्याची विक्री करतो.
मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी माशा मरू नयेत व निसर्गचक्र सुरळीत व्हावे, याचीही काळजी नरेंद्र घेत असतो. मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी धुराचा वापर केला जातो. त्यात नारळाच्या शेंड्या, वाळलेली पाने, कापूस, कडुनिंब असे पर्यावरणपूरक साहित्य जाळून मधमाश्यांना पोळ्यापासून दूर केले जाते. या धुराचा मधमाश्यांना त्रास होत नाही. पोळे काढतानाही अगदी हळुवारपणे काढले जाते. या माश्या जिवंत राहिल्याने इतरत्र जाऊन नवीन पोळे तयार करतात. एकंदरीत, निसर्गचक्र सुरळीत ठेवून आपला रोजगार शोधणाऱ्या या तरुणाला निसर्गातूनच सापडलेला हा "स्टार्टअप" इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.