लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : शिवजयंतीनिमित्त दारुविक्री बंदीचे आदेश असतांनाही मागच्या दाराने दारु विक्री जोरात सुरू होती. ड्राय डे च्या दिवशी दारु विक्री करणाºया संगम बारवर बाळापूर पोलिसांनी धाड टाकली. यात ६६ हजार ८१६ रुपयाची दारु व नगदी २८०० रुपये जप्त केले. बार मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आखाडा बाळापूर- शेवाळा रोडवर संगम बार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा दारुविक्री बंदीचा आदेश असताना संगम बारमध्ये पाठीमागील दरवाजाच्या बाजूने दारुविक्री सुरू होती. बीअर बार परवान्याचे अटी व शर्तीचे उल्लंघन करून विदेशी दारुची विक्री सुरू असल्याची खबर बाळापूर पोलिसांना मिळाली होती. गावात शिवजयंती मिरवणूक सुरू असतानाच पोनि व्यंकट केंद्रे, फौजदार सविता बोधनकर, शेख बाबर, संजय मारके, अर्शद पठाण यांनी सापळा रचून दारु विकताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई १९ फेब्रुवारी रोजी रात्री १०.२० वाजता घडली. या प्रकरणी ठाणेदार व्यंकटराव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात ओमप्रकाश नारायण ठमके (बार मालक) बार मॅनेजर दत्ता कुंडलिक मोरे, वेटर संतोष तुकाराम येरेवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार सविता बोधनकर करीत आहेत.
‘ड्राय डे’ च्या दिवशी दारुविक्री तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:14 AM