हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी स्वत: हून एस.टी. महामंडळाला निर्णय घेता येत नाही, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना महामारीचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे शासनाने २५ एप्रिल ते १ मे दरम्यान एस. टी महामंडळाच्या तिन्ही आगारांतील बसेस बंद केल्या आहेत. असे असतानाही काही प्रवासी तीचं ती ठेवणीतील कारणे सांगत कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालत आहेत. महामंडळाचे चालक, वाहक कधीही स्वत: हून प्रवाशांशी वाद घालत नाहीत. चालक, वाहकांना ड्यूटीवर जाते वेळेस प्रवाशांशी वाद घालू नका, अशा सूचना दिल्या जातात. प्रवाशी आपले मायबाप आहेत. त्यांच्याशी सन्मानाने वागा, त्यांची विचारपूस करा, असेही सांगितले जाते. पण काही प्रवासी असे असतात तेच ते प्रश्न विचारून चालक, वाहकांना बोलायला भाग पाडतात.
संचारबंदीमुळे सध्या बसेस बंद आहेत, हे माहिती असूनही एस.टी. का बंद आहे? केव्हा सुरू करणार? आम्हाला महत्त्वाचे काम आहे, अंत्यसंस्काराला जायचे आहे, आमचे नातेवाईक आजारी आहेत, शासनाने बसेस बंद करायला खरेच सांगितले आहेत का? असे बिनबुडाचे प्रश्न करून आपलेच हसे करून घेतात. नाईलाजाने आम्हाला तशीच उत्तरे देऊन त्यांची बोळवण करावी लागते.
तीचं ती कारणे
संचारबंदीत जिल्हा प्रशासनाचा आदेश असल्याशिवाय बस सोडता येत नाही, हे माहीत असतानाही काही जण तीच ती कारणे पुढे करतात. मग आम्हाला सांगावे लागते २५ प्रवासी असतील तर बस सोडता येतात. पण त्यासाठीही जिल्हा प्रशासनाची परवानगी लागते. आजतरी बसेस बंद आहेत. आता तुम्ही सुखरूप घरी चालते व्हा.
बसस्थानकात शांतता
कोरोनामुळे २५ एप्रिल ते १ मे पर्यत संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस जागेवरच आहेत. एरव्ही प्रवाशांची गर्दी रहायची पण आज बसस्थानकात शांतता आहे.
वाद अंगवळणी पडलाय...
एस. टी. महामंडळ प्रवाशांसाठी आहे हे आम्ही आधी सांगत असतो. पण काही प्रवासी असे असतात की घरूनच वाद करायचा असे ठरवून येतात. एस.टी. महामंडळाचे कर्मचारी संयमी आहेत. समोरचा प्रवासी वाद करणार हे माहिती असते. त्यामुळे तो अंगवळणी पडला आहे, असे एस. टी. कर्मचाऱ्याने सांगितले.
कोरोना महामारीमुळे एस.टी. महामंडळाची एकही बस २५ एप्रिलपासून सोडलेली नाही अन् सोडता येत नाही. जिल्हा प्रशासनाने सांगितले तरच एस.टी. बसेस महामंडळातून बाहेर काढता येतात.
संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली