हिंगोली जिल्ह्यातील एकूण ३२ वाळू घाटांच्या लिलावासाठी निविदा काढली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ घाट लिलावात गेले आहेत. यामधून ५.६० कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया झाली असतानाच एका ठिकाणचे प्रकरण न्यायालयात गेल्याने राज्यातील सर्वच ठिकाणच्या घाटांच्या पुढील प्रक्रियेवर स्थगिती आली होती. त्यामुळे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ही स्थगिती उठण्याची प्रतीक्षा केली जात होती. आता ही स्थगिती उठली आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून रक्कम भरून घेतल्यानंतर हे घाट त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. लिलावात गेलेल्या घाटांमध्ये वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव खु., परळी दशरथे, माटेगाव, औंढा तालुक्यातील आजरसोंडा, माथा हे कयाधू नदीवरील पाच घाट लिलावात गेले आहेत, तर कळमनुरी तालुक्यातील सापळी व कसबे धावंडा हे कयाधू नदीवरील दोन घाट लिलावात गेले आहेत.
२६ हजार ६४८ ब्रास वाळू उपलब्ध होणार
लिलावात गेलेल्या घाटांमध्ये ब्राह्मणगाव खु., २५५५ ब्रास, माथा २३१०, सापळी १८७३, परळी दशरथे २३५०, आजरसोंडा १७३१, कसबे धावंडा २७९०, माटेगाव २८५९ ब्रास अशी वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदा बांधकामांना पुन्हा वेग येणार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यात आणखी काही घाट लिलावात गेले तर गगनाला भिडलेले वाळूचे दर निम्म्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही.