लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : साठवलेली वाळू खनिकर्म अधिकारी व तहसीलदारांनी छापा मारून जप्त केली. या पाच ब्रास वाळूसाठ्यासाठी पाच पावत्या प्रशासनाकडे दाखल केल्या पण त्यापैकी एक पावती खरी तर चार बनावट आढळल्या. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळमनुरी तालुक्यातील मौजे येलकी येथे दि. ३० डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसीलदार कळमनुरी यांनी भेट दिली. त्यावेळी विजयराव शेषेराव पतंगे यांच्या घरासमोर पाच ब्रास वाळूसाठा आढळला. याबाबत विचारणा केली असता करूबे धावंडा वाळूघाटाच्या पाच पावत्या दाखवल्या. यापैकी एकच पावती खरी निघाली. उर्वरित चार बनावट असल्याचे निष्पन्न झाले. १९ जानेवारी २०१८ रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधीत लिलावधारकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. दि. २१ एप्रिल २०१८ रोजी तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नायब तहसीलदार प्रवीण नंदकुमार ऋषि यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळू लिलावधारक संदीप नरवाडे (प्रगती कंस्ट्रक्शन) याच्याविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. नागनाथ दीपक करीत आहेत.
पुन्हा बनावट पावत्यांवर वाळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:08 AM