औंढा नागनाथ (हिंगोली ) : गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या गस्तीपथकातील तलाठ्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील गोळेगाव येथे घडली.
हल्ल्यात तलाठी विठ्ठल शेळके हे जखमी झाले असून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वे औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील कार्यालयांतर्गत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागातर्फे विशेष गस्ती पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक शुक्रवारी रात्री १२ च्या दरम्यान गस्तीवर होते. यावेळी जिंतूर रोडवरील गोळेगाव येथे एक टिप्पर (एम एच ३८ डी ३३७७ ) अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली. त्यांनी पोलीस सोबत घेऊन टिप्परचा पाठलाग केला.
यावेळी तलाठी विठ्ठल शेळके यांनी टिप्पर रोखण्याचा प्रयत्न केला असता राहुल घुगे, सचिन शेषेराव बांगर व इतर दहा ते बारा जणांनी त्यांच्यावर कोयते,काठ्याने हल्ला केला. यानंतर सर्वजण फरार झाले. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउप निरीक्षक राहुल तायडे, अफसर पठाण हे करत आहेत.