औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील बेरुळा येथे चोरटी वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला केला. यामध्ये वाहन पळून नेण्याच्या नादात कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने कोतवाल जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.
बुधवारी पहाटेच्या सुमारास पूर्णा नदी पात्रात बेरुळा येथील वाळू घाटातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, सतीश जोशी, वैजनाथ मुंढे, रेनगडे, मारोती रोडगे, कोतवाल बळेश्वर नवले या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. तेथे दोन ट्रॅक्टर पकडले. तिसरे ट्रॅक्टर पकडताना कोतवाल बळेश्वर नवले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न चालक सुनील पवार (रा. बेरुळा) याने केला. यात नवले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिंगोलीत उपचार सुरू आहेत.
तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी या प्रकरणात मंडळ अधिकारी वैजनाथ मुंढे, तलाठी ए. के. रेनगडे यांना वाहन चालक व वाहनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ट्रॅक्टर पळून नेणारे बाळू सूर्ये, अजय सावळे दोघेही रा. बेरुळा यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारपासून कारवाईसध्या वाळू घाटाचे लिलाव रखडल्याने वाळूचे भाव तेजीत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमणात होत आहे. या पत्रातून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने गौण खनिज भरारी पथकांची स्थापना केली. शुक्रवारी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पथकांनी कारवाई केली. दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केली आहेत.