हिंगोली : खा. संजय राऊत यांनी आपल्या संपादकीय सदरातून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केली आहे. अशी तुलना करणे म्हणजे धनगर समाजाचा घोर अपमान असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांना धनगर समाजाची माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी आ. रामराव वडकुते यांनी केली.
येथील विश्रामगृहावर २६ मे रोजी माजी आ. वडकुते यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बाळासाहेब नाईक, पंढरीनाथ ढाले, विनोद नाईक उपस्थित होते. ते म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव देशातच नाही, तर जगात झाला आहे. देशभरातील मंदिरांचे पुनर्निर्माण व जीर्णोद्धार त्यांनी केले. सुखाने नांदता यावे, म्हणून इतर राज्यातील लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या राज्यात येत असत. याउलट ममता बॅनर्जी यांच्या राज्यातून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याशी करणे म्हणजे देशातील संपूर्ण धनगर समाजाचा घोर अपमान आहे. यापूर्वी मराठा समाजाबद्दलही आक्षेपार्ह लेखन केले. पक्ष प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना समज द्यायला पाहिजे होती. परंतु, पंधरा दिवस उलटले असतानाही संजय राऊत यांनी धनगर समाजाची माफी मागितली नाही. आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिवशी अहिल्यादेवी यांच्यासमोर नतमस्तक होऊन खा. संजय राऊत यांनी संपूर्ण धनगर समाजाची माफी मागावी, असा आदेश पक्षप्रमुख म्हणून द्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.