मुंबई/हिंगोली - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. गणेशोत्सवापूर्वी हा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यात आणखी १४ जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी भाजपचा वाटा इतर दोघांपेक्षा मोठा असेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. पंकजा यांनी हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
पंकजा मुंडे हिंगोली दौऱ्यातवर आल्या असता त्यांनी औंढा नागनाथ महादेवाचे दर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या स्वागताला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर उपस्थित होते. यावेळी, पत्रकारांनी पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात प्रश्न विचारला. तसेच, संतोष बांगर यांना मंत्रीपदाची संधी मिळेल का? असा प्रश्नही केला. त्याव, आमदार संतोष बांगर यांचा कारभार दबंग आहे. त्यांना मंत्रीपदासाठी माझा आशीर्वाद आहे, ईश्वर त्यांना नक्कीच संधी देईल, असेही पंकजा यांनी म्हटले.
मुंडेसाहेबांना जसं लोकांचं प्रेम मिळालं, त्याचा एक टक्काजरी मला मिळालं तर ते माझं भाग्य आणि ते प्रेम मिळतंय. माहूरपासून माझी यात्रा सुरु झाली, ती आज औंढा नागनाथ येथे पोहोचली आहे. येथे माझ्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचं शेवटचं दर्शन होतं, असं पंकजा यांनी म्हटलं. तसेच, आमदार संतोष बांगर यांना बंधू संबोधत, त्यांनी केलेल्या स्वागतामुळे यात्रेत चार चांद लागल्याचंही पंकजा यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ९ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेचे ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य आठ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून २ जुलै रोजी शपथ घेतली होती. आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा तिसरा विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे, शिंदे गटातील इच्छुक आणि चर्चेत असलेल्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, यापूर्वीही अनेकदा विस्ताराच्या तारखा आल्या पण चर्चा हवेतच विरुन गेल्या.