हिंगोली : जिल्ह्यात कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम तत्काळ पूर्ण करण्यासह ऑक्सिजन बेड वाढवा, रेमडेसिविरचा पुरवठा करा, आदी मागण्या खासदार राजीव सातव यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केल्या आहेत. त्यावर त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात रोज दोनशे ते तीनशे कोरोना रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रसार ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे. यामुळे भविष्यात भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती असून, वेळीच उपाययोजना वाढविणे आवश्यक आहे. सध्याचे ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऑक्सिजनचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा नागनाथ याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करावा. ऑक्सिजन साठा करण्यासाठी महाजम्बो टँकही खरेदी करावे तसेच ऑक्सिजन सिलिंडरचा अतिरिक्त साठा उपलब्ध करुन देण्यात यावा. जिल्ह्यातील डोंगरकडा, शिरडशहापूर, भांडेगाव अशा नवीन इमारती झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतही अत्याधुनिक कोरोना केअर सेंटर सुरू करुन क्षमता वाढवावी, अशा मागण्या खासदार सातव यांनी केल्या आहेत.
सध्या हिंगोली जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा असून, त्याचा पुरवठा वाढवावा आणि आगामी काळात कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करावा, अशी मागणी खासदार सातव यांनी पत्राद्वारे पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.
गायकवाड यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
खासदार सातव यांनी दिलेल्या पत्रानंतर जिल्ह्यात मुबलक खाटा उपलब्ध करण्यासह ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प युद्धपातळीवर उभारण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गायकवाड म्हणाल्या, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा झाली असून, रेमडेसिविरचा पुरवठाही वाढवला जाईल, अशी खात्री मंत्र्यांनी दिली आहे.