सवना येथील श्याम ऊर्फ ज्ञानेश्वर गजानन नायक (वय २३) तरुणाचा खून करून विहिरीत टाकल्याची घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मयताच्या डोक्याला दोन्ही बाजूला गंभीर मार बघता जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपासाची सूत्रे हलविली होती. प्रसंगी श्वानपथकास माग मिळाला नाही. काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले हाेते. तसेच मोबाईल कॉल रेकाॅर्डसह आवश्यक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली. परंतु, एक महिना झाला असतानाही पाेलिसांना तपासात यश आले नाही. आता तर या खुनाला एक महिना पूर्ण झाला असून गाेरेगाव पाेलिसांची तपासाची गती थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. तसेच २४ डिसेंबर राेजी मयताच्या शेतात रक्ताने माखलेल्या पांढऱ्या रंगाचा हातरुमालासह काही अंतरावर देशी दारुच्या बाटल्या, स्नॅक्सची रिकामी पाकिटे आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या वस्तू ताब्यात घेत तपासणीसाठी पाठविल्या आहेत. परंतु, अद्यापही या प्रकरणात काहीच निष्पण झाले नाही. मात्र, याबाबत मयताच्या कुटुंबीयांनी पाेलिसास विचारणा केली असता, केवळ विश्वास देत शाेध घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खुनासंदर्भात आवश्यक वस्तू व चाैकशीत मिळालेल्या माहितीवरून तपासात विलंब हाेत असल्याने तपासणीबाबत तर्कवितर्क लावले जात असल्याचे नागरिकांतून बाेलल्या जात आहे.
सवना खून प्रकरणाचा तपास लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:24 AM