हिंगोली : तालुक्यातील बोरीशिकारी येथे वाळू, मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या एका गावगुंडाने ग्रामस्थांना जेरीस आणले असून जिवघेणा हल्ला करून मारण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामस्थांचे जगणे मुश्किल करणाऱ्या या गुंडाला चाप बसवा अन्यथा आम्हाला बाहेरगावी जागा द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
या गावगुंडाच्या त्रासाला वैतागून ६ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, बोरीशिकारी येथील हा गावगुंड व त्याचे टोळके ग्रामस्थांना धमकावून त्यांना वारंवार मारहाण करीत आहे. तो त्याच्या शेतातील वाळू, मुरुम आदीचे अवैध उत्खनन करून भरधाव वेगाने वाहन गावातून नेतो. लहान मुलांना रस्त्यावर खेळणे अवघड झाले. याबाबत कोणी काही बोलले तर त्याच्यावर दहशत निर्माण केली जात आहे. कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर जीवघेणा हल्ला करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
या गावगुंडासह त्याच्या साथीदारावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही त्याच्यावर कुणाचा काहीच धाक नाही. ३१ जानेवारी २०२४ रोजी गावातील विलास व नामदेव बेंगाळ यांना कोणतेही कारण नसताना कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तर हे गावगुंड इतर युवकांनाही अवैध धंद्यांमध्ये उतरवत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.