राजकुमार देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यापासून २३ किमी अंतरावर वसलेलं म्हाळशी गाव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व स्वप्नपूर्ती केंद्राच्या प्रयत्नाने १३ वर्षापूर्वी गावात बचत गटाची चळवळ सुरू झाली. आणि या चळवळीने क्रांती घडवून आणली. याचं उदाहरण म्हणजे मायावती महिला बचत गट होय.गटात सुरुवातीपासून जे १० सभासद होते ते आजपर्यंत आहेत. ३० रूपये बचतीपासून गटाने सुरुवात केली होती. आज या गटाची उलाढाल १ लाख ७६ हजार इतकी आहे. गटाला बँकेने ३ वेळा कर्ज दिले आहे. शेवटचे कर्ज ३ लाख होते, ते परतफेड करून बँकेने ५ लाख देऊ केले आहे.काम कोणतेही असो मेहनत आणि जिद्दीच्या सोबतीला सामूहिक जबादारीची जाण असेल तर त्या कामाला एक वेगळेपण व नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास येते. समाजापुढे आदर्श निर्माण होतो. याप्रमाणेच सेनगाव तालुक्यातील म्हाळशी या गावातील १० महिलांनी गेल्या आठ वर्षांपासून करीत आहे. घर संसाराचा गाडा तर त्यांनी यशस्वीपणे पार पाडलाच पण अंगावरील कर्ज वेळेत परतफेड करून महिला बचत गटाची विश्वासर्हता निर्माण केली, जी आजच्या काळात अतिशय महत्त्वाची आहे.गावात मिळेल तेवढी जमीन भाडेतत्त्वावर घेऊन या दहा महिला सामूहिक शेती करतात. गेल्या वर्षांपर्यंत सोयाबीन, तूर व भाजीपाला लागवड करून ८ ते ९ हजार रूपये प्रत्येकीने निव्वळ नफा मिळविला. या वर्षी पारंपरिक शेतीला फाटा देत झेंडूच्या फुलाची शेती केली आहे.सर्व महिला सामूहिक पद्धतीने पेरणी, निंदन, खते, काढणी इ. कामे स्वत:च करतात. त्यामुळे मजुरावरचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढून मिळत आहे. तसेच सर्व महिला सर्वच कामे जबाबदारीने करीत असल्यामुळे कामाची गुणवत्ता पण चांगली होते. गटातील सर्वच महिलांनी अंतर्गत कर्जातून शेळी, गाय व म्हशी या सारख्या पशुधनाची खरेदी केली आहे. त्यामुळे कुटुंबाला दररोजच्या खर्चाला हातभार लागतो. यावेळी बँकेने ५ लाखांचे कर्ज दिल्यास आम्ही १० एकर शेतीवर वनस्पती शेती करणार असल्याचे गटाच्या अध्यक्षा संघमित्रा इंगोले यांनी सांगितले.स्तुत्य उपक्रमाचे कौतुकसेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील मायावती बचतगटाने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमास शासनाकडून होईल, ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हा सम्वयक अधिकारी विलास जगताप व व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी दिले आहे. तसेच वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल असेही सांगितले.बचतगटाने निर्माण केला आदर्शसेनगाव येथील मायावती बचत गटाने एक आदर्श निर्माण केला असून आर्थिक परिस्थितीवर मात केली आहे. बचतगटातील सर्व महिला परिश्रम घेत आहेत. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करणे तसेच त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण होऊन व्यवहारिक ज्ञान आणि नियमित बचतीची सवय लागावी. गाव पातळीवर सहभाग घेऊन गावाचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून शासनाकडून महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. त्या अनुषंगानेच सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व स्वप्नपूर्ती केंद्राच्या प्रयत्नाने १३ वर्षांपूर्वी गावात बचत गटाची चळवळ सुरू झाली. आणि या चळवळीने क्रांती घडवून आणली आहे.
बचतगटाने दिले पंखांना बळ, क्रांती घडविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:49 AM