हिंगोली : गाव तेथे शाळा व गाव तेथे रस्ता, हे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. परंतु, या धोरणाची अंमलबजावणी ना लोकप्रतिनिधी करतात, ना प्रशासन याकडे गांर्भियाने पाहते. त्यामुळे याचा त्रास ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतो. हिंगोली तालुक्यातील कोथळज ते समगा जाणाऱ्या रस्त्याची अंत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर सध्या एक ते तीन फुटापर्यंत पाणी साचत आहे. या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना मार्ग काढत समगा येथील शाळा गाठावी लागत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यात पडल्यामुळे एका विद्यार्थिनीचा हात फॅक्चर झाला.
हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील शंभरावर विद्यार्थी- विद्यार्थिनी गावात सातवीनंतर वर्ग नसल्याने समगा येथील शाळेत ज्ञानार्जनासाठी ये- जा करतात. सुमारे अडिच कि.मी.अंतर पार करीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. परंतु, यातील जवळपास एक कि.मी.रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला भराव टाकल्यामुळे रस्ता खोल पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सुमारे एक ते तीन फुटापर्यंत पाणी साचत आहे. तसेच चिखलही निर्माण झाला आहे. पाणी आणि चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने विद्यार्थी अडखळून पडत आहेत.दोन दिवसांपूर्वीच इयत्ता आठवीची विद्यार्थीनी दिव्या बालाजी घुगे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डा दिसला नसल्यामुळे पडली. यात तिचा हात फॅक्चर झाला आहे.
दरम्यान, दोन ते अडिच किमीच्या या रस्त्याचे काम मध्यंतरी सुरू करण्यात आले होते. एक ते दीड किमीचे कामही कामही झाले. परंतु, उर्वरित काम मात्र अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना साचलेले पाणी आणि चिखलातून वाट काढावी लागत आहे.
पाल्यांना जीव मुठीत धरून गाठावी लागते शाळा...कोथळज येथील सुमारे शंभरावर विद्यार्थी समगा येथील शाळेत जातात. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठीच्या एक ते दिड किमी रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. सध्या या रस्त्यावर एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.- राहुल घुगे, पालक, कोथळज
प्रशासनाला भिती कोणाची वाटते?...कोथळज ते समगा हा रस्ता सार्वजनिक असतानाही अर्धाभाग चांगला तर अर्धाभाग हा खड्डेमय करून सोडला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याबाबत कळविले. परंतु,गत वर्षापासून या रस्त्याकडे कोणी पहायलाही तयार नाही. आज अशी परिस्थिती आहे की वाहने तर सोडा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी शाळेत जाताना एक ते तीन फुट पाणी, चिखलातून वाट काढावी लागत आहे.- पंडीत घुगे, पालक, कोथळज