आडगाव रंजे (हिंगोली ) : वसमत तालुक्यातील हट्टा ते सावंगी रस्त्यावरील पुलाचे काम चालू असून या पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता काढून देण्यात आला होता. मात्र ३१ आॅगस्टच्या रात्री झालेल्या दमदार पावसामुळे हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या हट्टा ते सावगी हा रस्ता बंद असून ब्राह्मणगाव सावंगी या गावांचा संपर्क तुटलेला आहे.
रविवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे सोमवारी दिवसभर या गावांचा संपर्क तुटला होता. हट्टा ते सांवगी हा रस्ता असून या रस्त्यावर हट्ट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर धामोडा शिवारात ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या ठिकाणी मातीचा भराव टाकून वळण रस्ता तयार केला होता; मात्र या रस्त्यावर आडगाव रंजे, बोरीसावंत परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे वाहून जाणारे पाणी या ओढ्याला आले. त्यामुळे सध्या हा रस्ता बंद आहे. तसेच या रस्त्यावरील पुलाचे काम दोन तीन महिन्यांपासून सुरू असून अतिशय संथगतीने काम सुरू आहे.
पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते, मात्र ते काम झाले नसल्याने या गावाचा रस्ता सध्या बंद झाला आहे. तसेच सावंगी व ब्राह्मणगाव हे दोन्ही गावे पूर्णा नदीच्या काठावर असून एका बाजूला पुर्णानदी तर दुसऱ्या बाजूला धामोडा नाला त्यामुळे ही दोन गावे नदी व ओढ्यामधे अडकली असुन या गावांचा संपर्क तुटलेला आहे. गावातील नागरिक सध्या गावातच असून त्यांना गावाबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रविवारी व सोमवारी सुद्धा हा रस्ता बंद असल्यामुळे सावंगी ब्राह्मणगाव या गावातील नागरिक नदी व ओढयाच्या मध्ये अडकले आहेत.