हिंगोली : कोरोनामुळे दीड ते दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस मालक, चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्कूलबसचे हप्ते थकले असून, मोलमजुरी करण्याची वेळ वाहनमालक, चालकांवर आली आहे.
हिंगोली शहरात इंग्रजी, मराठी शाळांसह उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. यात जवळपास ४ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी स्कूलबसेस, व्हॅनमधून शाळेत ये-जा करतात. स्कूलबसमुळे पाल्य सुरक्षित राहत असल्याने पालकही मुलांना स्कूलबसद्वारेच शाळेत पाठविण्यावर भर देतात. यातून स्कूलबस, व्हॅनचालक, मालकांना मोबदला मिळतो. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याने अनेकांनी कर्ज काढून स्कूलबस खरेदी केल्या. हिंगोली शहरात जवळपास परवानाधारक २० स्कूलबस आहेत, तर अनेकांना शाळेकडून परवाना मिळाला नसला तरी जवळपास १०० ते १५० व्हॅन, आटोरिक्षातून विद्यार्थ्यांची ने-आण करतात. शाळा नियमित सुरू असताना वाहनाचे हप्ते नियमित भरले जात होते, मात्र कोरोनामुळे सर्व आशेवर पाणी फेरले. मागील दीड ते दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने स्कूलबस चालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर मर्यादा येत असल्याने प्रवासी सेवेसाठीही स्कूलबस वापरता येत नाही. त्यामुळे मागील १५ महिन्यांपासून स्कूलबसचे हप्ते थकल्याचे वाहनमालक सांगत आहेत.
गाडीवरील कर्ज कसे फेडणार?
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने नवीन स्कूलबस खरेदी केली होती. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आता मात्र कोरोनामुळे स्कूलबस जागेवरच उभी आहे. त्यात पावसामुळे पत्रा सडत असून, मोठे नुकसान होत आहे. हाताला काम मिळत नसल्याने स्कूलबसचे हप्तेही थकले आहेत.
- योगेश पडोळे, स्कूलबस चालक-मालक
स्वत: काही पैसे जमा करून तसेच काही फायनान्सवर पैसे घेत स्कूलबस विकत घेतली. शाळा सुरू असताना हप्ते वेळेवर भरले जात होते. तसेच काही रक्कम घरखर्चासाठी हातात शिल्लक राहत होती. कोरोनामुळे शाळा बंद असून, स्कूलबसही बंद आहेत. शासनाने स्कूलबस मालक, चालकांना मदत करावी.
- सीताराम जगताप, स्कूलबस चालक, मालक
कोरोनामुळे स्कूलबस एकाच जागेवर दीड वर्षापासून उभी आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवरही बंधने आली आहेत. त्यात डिझेल, पेट्रोलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे स्कूलबस जागेवरच उभी ठेवली आहे. हाताला मिळेल ते काम करीत असून, स्कूलबसचे हप्तेही थकले आहेत.
- राजू लोखंडे, स्कूलबस चालक, मालक
शाळा बंद असल्याने एकाच ठिकाणी उभी
१) शाळा बंद असल्याने स्कूलबस एकाच ठिकाणी उभी ठेवावी लागत आहे. पावसामुळे पत्रा सडत असून, मोठे नुकसान होत आहे.
२) स्कूलबस एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून उभी असल्याने मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे. पुन्हा बस सुरू करायची झाल्यास खर्च येणार आहे.
३) मागील अनेक दिवसांपासून स्कूलबस एकाच ठिकाणी उभी करावी लागत आहे. त्यात इतर व्यवसायासाठीही वापरता येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
हिंगोली शहरातील स्कूलबसमधील एकूण विद्यार्थी - ४५००
एकूण परवानाधारक स्कूलबसेस - २०