- इस्माईल जाहगीरदारवसमत : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूलबस उलटल्याची घटना वसमत- पूर्णा मार्गावरील बाभुळगावजवळ बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास घडली. या घटनेत ८ विद्यार्थी जखमी झाले असून, १३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
वसमत शहरातील युनिव्हर्सल इंग्लीश स्कूलची बस बुधवारी सकाळी ६:३० च्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी गेली होती. तालुक्यातील लहान, हिवरा, वाखारी येथील विद्यार्थ्यांना घेऊन ही बस पुर्णा- वसमतमार्गे शाळेकडे येत होती. बस बाभुळगावजळ आली असता चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उलटली. यात आराध्या बेटकर (हिवरा), तिरूपती कोरडे, अर्जून कोरडे, वसंता कोरडे, शिवम कोरडे, हिंदवी कोरडे, आरती कोरडे ( रा.लहान), लखन गंगावळे (वाखारी) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर अन्य १३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. यात चालकही जखमी झाला आहे. अपघातानंतर रस्त्याने ये- जा करणारे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रूग्णवाहिकेद्वारे विद्यार्थ्यांना वसमत येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली जखमी विद्यार्थ्यांची भेट....अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर वसमत येथील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वसमतचे उपविभागीय अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ, आ. राजू नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे यांनी रूग्णालयात भेट देवून विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच पालक व डाॅक्टरांशी चर्चा केली.