हिंगोली: सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यास पैसा लागत नाही, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. परंतु, तेथेही औषधी मिळत नसून ते बाहेरून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे सद्य:स्थितीत पहायला मिळत आहे.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात संसर्ग, अस्थिरोग, नेत्ररोग, अपघात विभाग, प्रसूती विभाग, स्त्री वैद्यकीय चिकित्सा विभाग, पुरुष विभाग, इंजेक्शन विभाग, बालरोग, कान-नाक-घसा अशा सात-आठ ओपीडी आहेत. जिल्हा रुग्णालयात नाही म्हटले तरी तीनशे ते साडेतीनशे रोजची ओपीडी असते. महागडी औषधी बाहेर परवडत नाही, खासगी दवाखान्यात राहून रोगांवर इलाज करणेही शक्य होत नाही. काळजीपोटी रुग्णांसोबत त्याचे एक-दोन तरी नातेवाईक आलेले असतात. अशावेळी खासगी दवाखान्यात राहण्याची पंचाईत होते. ऑटोरिक्षाचा खर्च, लॉजचा खर्च हे तर डोकेदुखी होऊन बसते. म्हणून तर सर्वसामान्य नागरिक सरकारी दवाखान्यात रुग्णांना घेऊन जातात. परंतु, तेथेही बाहेरुन औषधी विकत आणावी लागत असेल तर सरकारी दवाखाना काय कामाचा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
१४ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फेरफटका मारला असता आणि रुग्णांशी विचारणा केली असता सत्यता बाहेर आली. रुग्णांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
औषधी बाहेरुन आणणे परवडत नाही
सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांचा आहे.
आपला दवाखाना म्हणून आम्ही रुग्णाला घेऊन येतो. परंतु, दवाखान्यात भरती होऊन दोन दिवस झाले की, तिसऱ्या दिवशी डॉक्टर येतात आणि औषधीची चिठ्ठी लिहून देतात. ‘बाहेरुन औषधी आणा’, असे म्हणून निघून जातात. मग अशावेळेस आम्ही काय करायचे? असा प्रश्नही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.
रुग्णाजवळ बसावे की औषधी आणावी?
रुग्ण आमचा गंभीर असतो. रुग्णाजवळ बसणे अगत्याचे असते. डॉक्टरांना हे माहितीसुद्धा असते. परंतु, ते औषधीची चिठ्ठी देवून मोकळे होतात. सकाळी राऊंडला येतात आणि दुपारच्यावेळी तपासणीला आल्यानंतर औषधीची चिठ्ठी हातात ठेवतात आणि सांगतात, आमच्याकडे औषधी नाही तुम्ही बाहेरुन मेडिकलवरुन औषधी आणा. अशावेळी नाईलाज असतो. रुग्णाला एकट्याला बसवून औषधी घेऊन येतो.
चिठ्ठी तपासणीची की औषधीची?
बहुतांशवेळा डॉक्टर आत आले की, चिठ्ठी तपासणीची आहे की, औषधीची हेही कळत नाही. राऊंडला ज्यावेळी डॉक्टर येतात तेव्हा ते सांगतात तुम्हाला चिठ्ठी दिली आहे. त्यावरील औषधी तुम्ही बाहेरच्या मेडिकलवरुन विकत आणा. इथे दवाखान्यात ती उपलब्ध नाही. मग आम्ही अशावेळी विचार करतो, रुग्णाचे बरेवाईट होण्यापेक्षा ती विकत आणलेली बरी, असे म्हणून औषधी विकत आणतो.
...तर त्यांच्यावर केली जाईल कार्यवाही
जिल्हा सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांचा आहे. काही रुग्णांच्या तक्रारीही औषधी विकत आणावी लागत अशाच आहेत. जिल्हा सामाान्य रुग्णालयात सर्व औषधी मोफत उपलब्ध असतानाही बाहेरून का विकत आणावी लागत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे. जो कोणी माझ्याशी विचारपूस न करता परस्पर रुग्णाला औषधी लिहून देत असेल तर ते योग्यच नाही. यापुढे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. एवढेच नाहीतर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. रुग्णांची विचारपूस आणि त्यांना औषधी पुरविणे हे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामच आहे.-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली
फोटो आहे