सकाळी ११.३०च्या सुमारास सातव यांच्यावर अंत्यविधी झाला. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी आ.संतोष टारफे यांनी नेता म्हणून त्यांच्यासोबत रोजच्या कामकाजाची सवय असल्याने आताही ते उठून आदेश देतील, असे वाटत आहे. मात्र, त्यांचे हे अवेळी जाणे अत्यंत दुखदायी असल्याचे म्हटले. आ.संतोष बांगर म्हणाले, राजीवभाऊंचे आपल्यातून निघून जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे. अल्पावधीत खूप संघर्ष करून देशपातळीवर छाप सोडण्याची किमया साधणाऱ्या या नेत्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी वेगवेगळ्या पक्षात असलो, तरीही आमची मैत्री कायम होती. जिल्हा परिषद सदस्य असतानापासूनची मैत्री जोपासणारा एक जीवलग व राष्ट्रीय नेता गमावल्याने जिल्हा व राज्याची हानी झाल्याचे ते म्हणाले. खा.हेमंत पाटील यांना तर भावना व्यक्त करताना हुंदकाच आवरता आला नाही. सर्वांशी सौहार्दाचे संबंध ठेवून विकासाचा ध्यास असणारा नेता गमावल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीही भावनाविवश होत, खा.राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची ही दुर्दैवी वेळ आल्याची खंत व्यक्त केली. अनेक वेळा सोबत काम करताना त्यांची शेती, शिक्षण, गोरगरिबांविषयीची कणव, पक्षाच्या धोरणांवरची निष्ठा दिसून यायची, असे ते म्हणाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश दणाणी म्हणाले, सातव यांनी गुजरात राज्यात आम्हाला संघर्षाच्या वाटेवर नेले. स्वभावाने मृदू असले, तरीही सातव दृढनिश्चयी होते. त्यांची पक्षाविषयीची निष्ठा आणि कामात झोकून देण्याची वृत्ती आमच्या कायम स्मरणात राहील.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, आपल्या भागाचा, राज्याचा नव्हे, तर देशपातळीवर काम करणारा काँग्रेसचा चमकता तारा निखळला आहे. त्यांची विकासाची धडपड आणि पक्षसंघटनेसाठी सोनिया गांधी यांनी सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यागाची भूमिका राहिली. त्यामुळेच ते राहुल गांधी यांचे जीवलग मित्र बनले. प्रियंका गांधींनीही तोच विश्वास ठेवला.
बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, हिंगोलीसारख्या ठिकाणाहून देशाच्या राजकारणात छाप पाडणे सोपे नाही. मी राजीव सातव यांचा संघर्ष अगदी जवळून पाहिला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि मागच्या वेळी माझ्यासोबत महाराष्ट्रातून लोकसभेवर गेलेला दुसरा खासदार म्हणजे राजीव. त्यांना आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात मोठे भवितव्य होते. असा हा नेता अतिशय कमी वयात गमावल्याचे दु:ख होत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मी राजीव सातव यांना लहान भाऊ मानायचो. मागच्या लोकसभेत त्यांना जवळून पाहता आले. शेतकरी, गोरगरिबांच्या प्रश्नांवर त्यांची पोटतिडीक दिसून यायची. वेगवेगळे प्रश्न हाताळून अत्यंत अभ्यासू पद्धतीने त्याची मांडणी करायचे. त्यामुळे चारदा संसदरत्नही राहिले. देशपातळीवर आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर गांधी कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला होता. हा उमदा नेता आज आमच्यातून गेल्याने देशभर पसरलेला त्यांचा चाहता वर्ग दु:खाच्या खाईत गेला. त्यांना व कुटुंबीयांना यातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो.
काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी एच.के. पाटील म्हणाले, खा.राजीव सातव हे काँग्रेसच्या विचाराशी घट्ट बांधिलकी असलेले नेते होते. या विचारांची ताकदच सामान्यांमध्ये पुन्हा रुजवून काँग्रेसला उभारी देता येईल, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या निधनाबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना आतीव दु:ख झाले आहे. एक वेगळी उंची गाठलेला नेता आपण गमावला आहे. पक्ष या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
यावेळी विविध भागांतून आलेले हजारो कार्यकर्ते आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देताना, साश्रूनयनांनी परतत असल्याचे दिसत होते. सातव यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेताना अनेक जण धाय मोकलून रडत होते. नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे पाहायला मिळाले. समोरील दृश्य पाहून वारंवार पाणावणाऱ्या डोळ्यांच्या कडा आणि त्याला आवर घालत नेत्याला डोळे भरून पाहण्याची आस असेच एकंदर चित्र होते.