जिल्ह्यात जवळपास ९ हजार ट्रस्ट, संस्थांची नोंदणी झालेली आहे. यातील १ हजार ४५० संस्थांनी नियमांनुसार ऑडिट रिपोर्ट आणि चेंज रिपोर्ट सादर करण्यास टाळाटाळ केली. तसेच त्या संस्था वर्षानुवर्षे निष्क्रिय होत्या. कोणतेच कामकाज होत नव्हते. या संस्था नोंदणीकृत असल्याने धर्मदाय आयुक्तालयावर निष्क्रिय संस्थांचा बोजा वाढत होता. दरम्यान, १३ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन धर्मदाय आयुक्तांच्या निर्देशानंतर अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम हाती घेतली.
हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ४५० संस्था निष्क्रिय आढळून आल्या. त्यामुळे या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. आता नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टच्या मालमत्तांची पडताळणी करून कारवाई करण्याचे तसेच अहवाल सादर करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील या संस्थांची मालमत्ता पडताळणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने त्या-त्या विभागातील विभागप्रमुखांकडून माहितीही जमा केली जात आहे.
शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा आदींचा समावेश
जिल्ह्यातील नोंदणी रद्द झालेल्या १ हजार ४५० संस्थांमध्ये शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, ग्रंथालये आदींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. आता रद्द झालेल्या संस्थाचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आतापर्यत किती संस्थांची मालमत्ता जमा करण्यात आली, याबाबत मात्र माहिती उपलब्ध झाली नाही.