लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा: वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे सत्र सुरूच असून शुक्रवारी तीन वेळेस या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहते. या भूकंपाची २.६ रिश्टर स्केलवर नोंद झाल्याची माहिती वसमत तहसीलने दिली आहे. तर शनिवारी सकाळी ५.५१ वाजता देखील भूकंपाचा धक्का जाणवला आहेत. त्या धक्क्याची नोंद झालेली नव्हती. या भागात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.पांगरा शिंदे येथे सौम्य धक्के एक वर्षांपासून जाणवते. त्याचे अद्याप संशोधन लागलेले नसून वरिष्ठ स्तरावरून कोणत्याच प्रकारचा शोध घेण्यासाठी संशोधन झालेले नसल्याने गूढ आवाजाचे रहस्य अद्याप कायम आहे. वर्षभरापासून अनेकवेळा भूकंपाचे धक्के पांगरा शिंदे या गावाला बसलेले असून शुक्रवारी चार वेळेस सौम्य भूकंप जाणवला. या भूकंपाची लातूर भूमापक केंद्रावर २.६ रिश्टर स्केलवर नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली .शुक्रवारनंतर शनिवारी सकाळी ५.५१ वाजता भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे समजते.वसमत, कळमनुरी, औंढा या तीन तालुक्यातील जवळपास २२ गावांना भूकंपाचे धक्के बसलेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांगरा शिंदे हे गूढ आवाजाचे मुख्य केंद्रबिंदू असून त्याचा इतर गावांना धक्का बसत असतो.गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या सत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भूकंपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात पसरत आहे. छोट्या-मोठ्या घटनांचे संशोधन करण्यात रस दाखविला जातो; परंतु अत्यंत धक्कादायक बाब असलेल्या व संशोधनाचा विषय ठरलेल्या पांगरा शिंदे येथील गूढ आवाजाचे संशोधन करण्यास प्रशासन दिरंगाई दाखवित आहे.पोत्रा : १० नोव्हेंबर सकाळी ३.३० वाजता गूढ आवाजाने कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसर हादरल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी ३.३० च्या सुमारास पोत्रा परिसरात भूगर्भातून पहिला गूढ आवाजाचा हादरा जाणवला.या आवाजात रात्री गाढ झोपेत असलेले पशु प्राणी, मनुष्य प्राणी, अचानक जागे झाले. पक्ष्याचा किलबिलाट ऐकावयास मिळाला. त्यानंतर सकाळी ५.३० च्या सुमारास दुसरा गूढ आवाज आला. हा आवाज एवढा मोठा होता की, त्याने लोकाची साखरझोप कडू केली. या आवाजात मात्र घरावरील टीनपत्रे,भांडी कंप पावत असल्याचा आवाज आला. या आवाजाने पोत्रा परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:00 AM