हिंगोली शहरातून दोन वाहनांद्वारे रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके, पोह. संभाजी लेकुळे, राजू ठाकूर, भगवान शिंगाडे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने ७ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सापळा लावला. यावेळी एमएच ४० सीडी ११७४ व एमएच ३७ टी १६६४ क्रमांकाचे पिकअप वाहने थांबवून तपासणी केली असता या वाहनात रेशनचे धान्य असल्याचे आढळले. एमएच ४० सीडी ११७४ या वाहनात ७० पोत्यांमध्ये ६९ हजार रुपयांचा ३४.५ क्विंटल रेशनवर दिला जाणारा तांदूळ व ११ पोत्यांमध्ये ११ हजार रुपये किमतीचे ५.५ क्विंटल गहू, असा एकूण ४० क्विंटल धान्य आढळले. तर एमएच ३७ टी १६६४ या वाहनात ७७ पोत्यांमध्ये ७६ हजार रुपये किमतीचे ३८ क्विंटल गहू आढळला. पोलिसांनी दोन्ही वाहने रेशनच्या धान्यासह ताब्यात घेतले असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या फिर्यादीवरून चालक अरबाज असीफ खान (रा. पलटण, हिंगोली), कैलास प्रेमानंद पेषकलवाड (रा. उफळी पेन, ता. वाशिम) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाय नावाचे पाेते
पोलिसांनी पकडलेल्या एका वाहनातील रेशनच्या धान्यासाठी वापरलेल्या पोत्यांवर मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाय प्रा. लि. असे छापलेले आहे. रेशनचे धान्य कोठून आणले, कोणत्या दुकानाचे होते, कोठे नेले जाणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.
फोटो :