हिंगोली : एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी महिला एसटी चालक भरती प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर प्रशिक्षण घेण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर काही कारणाने हे प्रशिक्षण झालेच नाही. त्यामुळे महिला उमेदवारांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे.
महिला उमेदवारांची निवड झाल्यानंतर एसटी महामंडळाने २६ नोव्हेंबर २०२० या दिवशी पुणे येथे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले होते. या निवड प्रक्रियेत ६९० अर्ज आले होते. त्यात १८९ पुरुष तर आठ महिला चालकांची परभणी विभागातून निवड झाली होती. त्यामध्ये हिंगोलीतील एका महिला चालकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत कोरोना आजार कमी झाला नसल्यामुळे हे प्रशिक्षण तूर्त रद्द करण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे निवड होऊनही महिला एसटी चालकांना नोकरीपासून दूरच राहण्याची वेळ आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी असे तीन आगार आहेत. हिंगोली आगारात चालक आणि वाहक मिळून २४६, वसमत आगारात चालक आणि वाहक मिळून २२० आणि कळमनुरी आगारात चालक आणि वाहक मिळून १४४ असे पुरूष वाहक असून यात ३० महिला वाहकांचा समावेश आहे. हे सर्व सद्यस्थितीत कार्यरत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातून एका महिलेची निवड
एसटी महामंडळाने महिला चालक भरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हिंगोलीतील एका महिला उमेदवाराने त्यासाठी अर्ज केला होता. निवड झाल्याची माहिती कळाल्यानंतर महिला उमेदवारास आनंद झाला होता. परंतु कोरोना महामारीमुळे हे प्रशिक्षण अर्ध्यावरच राहिले आहे. सदरील प्रशिक्षण हे केव्हा होते आणि नोकरी केव्हा लागते, याकडे निवड झालेल्या महिला उमेदवारांचे डोळे लागून राहिले आहे.
हिंगोली जिल्हा होऊनही कारभार परभणीहून
हिंगोली जिल्हा होऊन २२ वर्ष पूर्ण झालेले आहेत. परंतु कारभार मात्र परभणी वरूनच चालतो. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा अशी पाच तालुके आहेत. एसटी महामंडळाचे उत्पन्नही चांगले आहे. परंतु प्रशासकीय कामकाज आणि तांत्रिक बाबीसाठी मात्र परभणी जिल्ह्याकडे विचारणा करावी लागते.
महिला चालक निवड स्वागतार्ह
एसटी महामंडळाने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. महिला चालक निवड केल्यास महामंडळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा राहील. तसेच एका अर्थाने महिलांचा सन्मान केल्यासारखेच होईल.
-डी.आर. दराडे, विभागीय सचिव, एस.टी. कामगार सेना