वसमत : राष्ट्रीय नेते शरद पवार यांना माणसाची पारख आहे. योग्य व्यक्तीला पद देण्याची त्यांची भूमिका असते. जयप्रकाश दांडेगावकर यांच्यातील नेतृत्वगुण त्यांनी हेरल्याने त्यांना राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. दांडेगावकर त्यांच्या कर्तृत्वाने या पदाला न्याय देतील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वसमत येथे नागरी सत्कार सोहळ्यात केले.
वसमत येथे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुक्रवारी भव्य नागरी सत्कार पार पडला. कार्यक्रमास आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. राजू पाटील नवघरे, माजी आ. पंडितराव देशमुख, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, काँग्रेस नेते डॉ. एम. आर. क्यातमवार, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, शिवाजी अलडिंगे, नाथराव कदम, आंबादासराव भोसले, चेअरमन खराटे, सुनील काळे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात आ. राजू नवघरे यांनी वसमत मतदारसंघातील बाभुळगाव, साळणा, कुरुंदा गावांत आरोग्य केंद्र व उपजिल्हा व महिला रुग्णालयाचा विस्तार करण्याची मागणी आरोग्यमंत्र्याकडे मांडली. तसेच दांडेगावकरांना मिळालेल्या संधीचे सोने करुन शेतकरी, ऊस उत्पादक, साखर कारखानदारी यांना मदत हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणात दांडेगावकरांच्या वाटचालीचे पैलू उलगडले. कडक शिस्तीचे, परखड व्यक्तिमत्त्व, खोटे आश्वासन न देता जे आहे ते स्पष्ट सांगण्याचे धाडस असणारे म्हणूनच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्षपदही त्यांना दिले आहे. नेतृत्वगुण व सहकारातील कार्य पाहून साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामाची हातोटी पाहता साखर उद्योगाला नवी दिशा व झळाळी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, संघटना, नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गजानन ढोरे, प्रकाश इंगळे यांनी केले.
चिमटे व टोलेबाजी
या कार्यक्रमात ना. राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीत काही जण गळ्यात हात टाकून पायात पाय घालण्याचे काम करत असल्याचे सांगून अशा पायात पाय घालणाऱ्यांना सरळ करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन केली. त्याचे अध्यक्षपद दांडेगावकर यांच्याकडे असल्याचे सांगितल्याने पायात पाय घालणारे राष्ट्रवादीतील मंडळी कोणती याची चर्चा सुरू झाली आहे. वसमतचे आ. नवघरे हे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. सक्षम नेतृत्व आहे, अशी ग्वाही व्यासपीठावरील शिवसेना नेत्यांनी दिली. शिवसेनेने शिक्कामोर्तब केल्याने नवघरे यांच्या नेतृत्वाला भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितल्याने व्यासपीठावरील खासगी गप्पा उजेडात आल्याने समोर आले. दांडेगाव यांनी या सोहळ्यास जसे एकत्र आले. तसेच विकासासाठी या, मला विरोध करत होते. तसा नवघरे यांना करू नका असे आवाहन केल्याने हंशा पिकला. आ. सतीश चव्हाण यांनी भाजपने हिंगोली व वसमत येथेही सत्कार केल्याने लोकशाही जिवंत असल्याचे दाखविल्याचा चिमटा घेतला. आ.नवघरे यांनी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मतदार संघातील विकासकामांची मागणीही जंगीच आरोग्यमंत्र्यांना दिली. या कामांना मंजुरी देत असल्याचे मंत्र्यांनी सांगून टाकले.