यामध्ये ४७५० परसबागा विकसित करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २००० परसबागा तयार करण्यात आलेल्या आहेत. या बरोबर महासामृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत विविध उपजीविकेच्या कामाचे व प्रक्रिया उद्योगाचे वाढ करण्यात येत आहे.
शेती आधारीत आणि बिगर शेती आधारित महिलांना विविध व्यवसाय निर्माण करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी उमेद अभियानांतर्गत चालू केलेल्या या मोहिमेतून ग्रामीण महिलांचा दशसूत्रीवर आधारित सर्वांगीण विकास करण्यात येत आहे.
कळमनुरी तालुक्यातील मासोड या गावी सिंधुताई देवीदास जांबूतकर, दुधाधारी महाराज महिला स्वयसहायता समूहमार्फत ३० हजारांचे कर्ज घेऊन भाजीपाला रोपवाटिका तयार केलेली आहे. या रोपवाटिकेतून वार्षिक २ लाख रुपयाची उलाढाल केली असून जवळपास रु १.५ लाखाचा निव्वळ नफा मिळाला आहे. संपूर्ण सेंद्रिय खत व विविध जीवामृत छबुताई नथुजी जांबूतकर यांनी तयार करून या रोपवाटिकेला पुरविले. पशुसखी उर्मिला जांबूतकर यांनी विविध पोषण परसबागेसाठी लागणाऱ्या रोपांची प्रचार प्रसिद्धी करून या रोपवाटिकेला जास्तीत जास्त ग्राहक उपलब्ध करून दिले व सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यासाठी स्त्रीशक्ती प्रभाग संघाच्या लिपिका शीलाताई कांबळे यांनी गटातील विविध महिलांना या रोपवाटिकेच्या विविध रोपांची माहिती दिली.
या कामासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, कळमनुरी येथून संतोष भोसकर, प्रकाश धुळे, शिल्पा दोडेवार यांनी मार्गदर्शन केले. यातून सदरील भाजीपाला रोपवाटिका विकसित झाली आहे. या रोपवाटिकेतून पोषण परसबागेसाठी प्रतिरोप रु. १ प्रमाणे व भूमिहीन महिलांना मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत, किरण गुरमे यांनी रोपवाटिकेचे व्यवस्थापन, संगोपन, वितरण व विस्तार याबाबत मार्गदर्शन केले.
सदरच्या नावीन्यपूर्ण रोपवाटिका विकसित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक जे.वि. मोडके यांचे मार्गदर्शन मिळाले.