वसमत ( हिंगोली ): कालव्याच्या कडेवर उभे राहून सेल्फी काढण्याच्या मोहात दोन युवक कालव्यात बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी असोला शिवारात घडली. तेजस मनोज खंदारे ( १७ ) आणि कपिल गायकवाड ( १८) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. यातील तेजसचा मृतदेह सापडला असून कपिलचा शोध सुरु आहे.
वाई येथील तेजस मनोज खंदारेच्या बहिणीचे येत्या १० तारखेला लग्न आहे. मंगळवारी लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी तेजस वाई येथील मित्र संकेत खंदारे आणि वसमत येथील कपिल गायकवाड ( १८ ) यांनासोबत घेऊन औंढा नागनाथ तालुक्यात गेला होता. दुपारी उन्हात थकल्याने तिघेही मित्र असोला परिसरातील कालव्यात अंघोळीसाठी उतरले.
परंतु, तेजस व कपिल या दोघांना पोहता येत नव्हते. यामुळे ते दोघे कालव्याच्या कडेला बसूनच अंघोळ करत होते.तर संकेत पाण्यात उतरला. दरम्यान, सेल्फी काढत असताना तोल गेल्याने तेजस आणि कपिल कालव्यात बुडाले. हे पाहताच संकेतने त्यांना वाचवण्यासाठी गेला. प्रयत्न अपुरे पडत असल्याने संकेतने मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाजाने आजूबाजूची ग्रामस्थ मदतीसाठी धावले.
दरम्यान, घटनेची माहीती मिळताच जवळा बाजार चौकीचे फौजदार सतिष तावडे, भुजंग कोकरे, शे खतिब यांनी कालव्यात बुडालेल्या दोघांचा तत्काळ शोध सुरु केला. काही वेळाने तेजसचे प्रेत जवळा बाजार शिवाराजवळ सापडले. तर कपिलचा शोध सुरु आहे.
चार दिवसांवर बहिणीचे लग्न बहिणीचे लग्न चार दिवसावर आलेले असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेने खंदारे आणि गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.