निराधार धडकले सेनगाव तहसीलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:10 AM2018-11-22T01:10:03+5:302018-11-22T01:10:25+5:30
येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते.
सेनगाव : येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते.
तालुक्यात निराधार योजनेची सूक्ष्म तपासणी करून अनेक अनेक निराधार लाभार्थ्यांचे अनुदान प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान पूर्ववत चालू करावे. तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी, स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने चालू करून मजुरांच्या हाताला काम द्यावे आदी मागण्यांकरिता २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता येथील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला.
हा मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे, तालुकाध्यक्ष विनायक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष सतीश खाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, डॉ. रवि पाटील, श्यामराव जगताप, अशोक सरनाईक, बाबूराव बांगर, डॉ. राजेश भोसले, विलास गोरे, बंटी नागरे, श्रीरंग कायंदे, डॉ. माणिक देशमुख, अजय विटकरे, जनार्दन कोरडे आदीसह मोठ्या संख्येने निराधार लाभार्थी महिला, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निराधारांचे बंद झालेल्या अनुदान पूर्ववत चालू न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तालुकाध्यक्ष देशमुख यांनी दिला. बंद झालेले अनुदान चौकशी करून चालू करण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार पाटील यांनी मोर्चेक-यांना दिले.
उद्याही मोर्चा : पुन्हा दोन गटांचे अस्तित्व
सेनगाव तहसीलवर आज काँग्रेसच्या एका गटाने मोर्चा काढला. उद्या पुन्हा दुस-या गटाचे आंदोलन आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी निराधारांच्या प्रश्नालाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्येच अंतर्गत स्पर्धेला उधाण आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना कमी लेखण्याची कोणतीच सोडली जात नाही. त्यामुळे हे वाद आगामी काळात आणखी बरेच रंग दाखवतील, असे चित्र आहे. पहिल्यांदाच या वादाला तोंड फुटले असेही नाही. यापूर्वीही अनेक किस्से घडले आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे.