हिंगोली : सेनगाव बाजार समितीत राजीनामे, अपात्रतेची कारवाई व निधनामुळे १८ संचालकांपैकी केवळ ७ संचालकच उरल्याने शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याचा आदेश १२ सप्टेंबर रोजी दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणावर यामुळे पडदा पडला आहे.
सेनगाव बाजार समितीत विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे व माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटातील संचालक सत्तेत होते. मात्र आपसी गटबाजी झाली. पदाधिकारी निवडीच्या नाराजीतून राजकारणाने पराकोटीचा स्तर गाठला. अविश्वासनाट्य झाले. त्यानंतर संचालक राजीनाम्यांचा प्रकार झाला. त्यामुळे ही बाजार समिती बरखास्त होणार असल्याच्या वावड्या उठत होते. या वावड्या आज वास्तवातच उतरल्या आहेत. या आदेशात म्हटले की, या बाजार समितीच्या ९ सदस्यांनी राजीनामे दिले. एक अपात्र ठरला तर एकाचे निधन झाले. त्यामुळे १८ पैकी ७ संचालकच उरले आहेत. गळालेल्यांमध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातील आहेत.
मात्र शासनाच्या नव्या धोरणात या मतदारसंघातून सदस्य निवडून देण्याची तरतूदच वगळली आहे. केवळ सात संचालकांवर बाजार समितीचे कामकाज पार पाडण्यास ते असमर्थ ठरत आहेत. या ठिकाणी संचालकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाल्याने सदर पदे नामनिर्देशनाने भरणे उचित होणार नाही. त्यामुळे बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेणे योग्य होईल, अशी शासनाची खात्री झाल्याचेही आदेशात म्हटले आहे.
या बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा देणाऱ्यांत अमोल चंद्रकांत हराळ, गिरीधारी तोष्णीवाल, शंकरराव बोरुडे, श्रीकांत कोटकर, सुमित्रा नरवाडे, द्वारकदास सारडा, गोदावरी शिंदे, गोपाळराव देशमुख, संजय देशमुख यांचा समावेश आहे. तर सजेर्राव पोले हे मयत झाले होते. सदाशिव सोनटक्के अपात्र झाले आहेत. तर सध्या पदावर असलेल्यांमध्ये सभापती डॉ. नीळकंठ गडदे, उपसभापती इंदुमती देशमुख, विनायक देशमुख, आयाजी पाटील, छाया पोले, दत्तराव टाले, संतोष इंगोले यांचा समावेश असला तरीही नव्या निर्णयाने त्यांचीही पदे बरखास्त झाली आहेत.