हिंगोली : सेनगाव येथील प्रथम सत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाचा इमारतीचा प्रश्न भूसंपादनातच अडकून पडला आहे. न्यायालयाचा इमारतीकरिता प्रशासन पातळीवर गतिमान कारवाई होत नसल्याने न्यायालयाचे कामकाज अपुर्या जागेत चालू आहे.
सेनगाव येथील न्यायालयाचा इमारतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. न्यायालयाचा इमारतीसाठी शहर परिसरात शेतजमीन मिळत नसल्याने इमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे. सेनगाव येथे न्यायालयाची स्थापना होवून जवळपास पंधरा वर्षे झाली आहेत. असे असताना न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत उभी राहू शकली नाही. सद्यस्थितीत सेनगाव येथे दोन न्यायालयाचे कामकाज चालू आहे; पंरतु इमारत नसल्याने कामकाजासाठी मोठी गैरसोय होत आहे. येथील तहसील कार्यालयाचा दुसर्या मजल्यावर अपुर्या जागेत न्यायालयाचे कामकाज चालू आहे. या ठिकाणी न्यायदान कक्ष, न्यायाधीश कक्ष, कार्यालयीन कामकाज कक्ष, वकील संघ आदी व्यवस्था अपुर्या जागेत आहेत.पक्षकारांनाही या ठिकाणी उभे राहण्यासाठी जागा नाही.
न्यायालय इमारतीकरीता मागील दहा वर्षांपासून भूसंपादनाचे काम चालू आहे; पंरतु लोकप्रतिनिधी, अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे अद्यापही इमारतीकरीता जमीन निश्चित होवू शकली नाही. इमारतीकरीता रिसोड रस्त्यावरील काही शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत; परंतु भूसंपादनातच सेनगाव न्यायालय इमारतीचा प्रश्न अडकून पडला आहे. तो सुटण्याचे नावच घेत नाही.