लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या मस्के नामक अभियंत्यास औंढा नागनाथ येथील पंचायत समितीत बदली हवी होती. त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक चंद्रशेखर रामनारायण वाजपेयी याच्याकडे यासाठी विचारणा केली. यासाठी वाजपेयीने त्यास होकार दिला.
१३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या बदलीचे आदेशही निघाले आहेत, तर ठरल्याप्रमाणे बदली औंढा नागनाथ पंचायत समिती येथे झाली आहे. या बदलीचा मोबदला म्हणून वाजपेयी याने तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम आज देण्याचे ठरले. दरम्यान, मस्के यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून सायंकाळी जि. प.त सापळा रचला. या सापळ्यात वाजपेयी अलगद अडकला. जिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपतचे उपअधीक्षक नीलेश सुरडकर, जमादार विजयकुमार उपरे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, रूद्रा कबाडे, हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.