हिंगोली : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे वसाहत उभारण्यास मंजुरी मिळाली असून, जागेचा प्रश्नही मिटला आहे. मराठवाड्यातील ही वसाहत दुसरी ठरणार ४० कुटुंबीयांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील वडार समाजातील ४० कुटुंबे पालावर राहतात. त्यांना पक्के घरे नाहीत. शेती व रोजगार नसल्याने भटकंती करून उदरनिर्वाह करावा लागतो. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण कायम असून, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहेत. शासनाने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील समाजासाठी सुरू केलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गंत वाकोडी येथील ४० कुटुंबीयांना न्याय मिळू शकतो, हे पालावरील नागरिकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे जवळपास ४० कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विविध कागदपत्रे गोळा करून, तसा प्रस्ताव २०१४ मध्ये सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे पाठविला होता. हिंगोली येथील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाने हा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तत्कालीन जिल्हा प्रशासनाने प्रस्तावास मान्यता दिली. मात्र, त्यानंतर खरी अडचण होती जागेची. वसाहत उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. अनेक त्रुटींमुळे जागेचा प्रश्न रेंगाळत होता. अखेर पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, कळमनुरीचे तहसीलदार यांच्या प्रयत्नातून जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. वाकोडी परिसरात गट क्र. १३० मधील ४ हे.आर जमीन वसाहत उभारणीसाठी मंजूर झाली असून, जागेची योजनेच्या नावे सातबाराही तयार झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी जागेची पाहणी केली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागतकर, गोविंदा मानकरी यांच्यासह विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे येथील ४० कुटुंबीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर सुविधा उपलब्ध करून देण्याचा होणार प्रयत्न
पहिल्या टप्प्यात लाभार्थींना घरकूल, रस्ते, नाली, मलनिस्सारण, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर, लाभार्थींच्या पाल्यांना आश्रमशाळा, निवासी शाळेत प्रवेश देऊन त्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. बचतगट स्थापन करून विविध रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
वाकोडी येथील वसाहत उभारणीचा प्रश्न जागेमुळे रखडला होता. मात्र, पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या प्रयत्नामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. पालावर राहणाऱ्या ४० कुटुंबीयांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- शिवानंद-मिनगीरे, सहायक आयुक्त, समाजकल्याण हिंगोली
फोटो :