हिंगोली : येथील बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया अखेर बिनविरोध पार पडली. यात भैय्या पाटील गोरेगावकरांना मात देण्यात आ.तान्हाजी मुटकुळे यांची खेळी यशस्वी ठरली. सभापतीपदी भाजपचे हरिश्चंद्र शिंदे तर उपसभापतीपदी शंकर पाटील यांची निवड झाली आहे. १८ पैकी दोन सदस्य अनुपस्थित होते.
हिंगोली बाजार समितीच्या निवडणुकीत मागच्या वेळी असलेली राजकीय समीकरणे यावेळी बदलली आहेत. त्यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे भैय्या पाटील गोरेगावकर यांना सभापतीपदाची संधी मिळू शकली नाही. गोरेगावकर राष्ट्रवादीतून सेनेत आले अन् त्यांचा दावा संपुष्टात आणला गेला.यापूर्वीच सभापतीपदासाठी हरिश्चंद्र रामप्रसाद शिंदे व उपसभापतीपदासाठी शंकर बाबाराव पाटील यांचे नाव निश्चित होते. त्याप्रमाणे आज निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर या दोघांचेच अर्ज आले होते. छाननीत दोन्हीही अर्ज वैध ठरले.
या सभेला रामेश्वर शिंदे, दत्तराव जाधव, गजानन घुगे, उत्तमराव वाबळे, रामचंद्र वैद्य, रावजी वडकुते, संजय कावरखे, शे.बु-हान शे.मुन्नू, जिजाबाई शिंदे, किसनराव नेव्हल, शंकर पाटील, लिंबाजी मुटकुळे, प्रभाकर शेळके, हरिश्चंद्र शिंदे, बबन सावंत, प्रशांत सोनी या सोळा जणांची उपस्थिती होती. तर राजेश पाटील व नीता पाटील हे दोन संचालक अनुपस्थित होते. शिंदे यांचे सूचक कावरखे तर अनुमोदक घुगे व पाटील यांचे सूचक वाबळे तर अनुमोदक वडकुते हे होते. छाननीनंतर ठरावाची प्रक्रिया करून अध्यासी अधिकारी तथा सहा. निबंधक औंढा एम.ए. भोसले यांनी निवडीची घोषणा केली. यावेळी भोसले यांना सहा.निबंधक कळमनुरी के.एम.चौधरी, सहकार अधिकारी ए.बी. चव्हाण, डी.एल.डुकरे, बाजार समिती सचिव नारायण पाटील, सहा. सचिव रवींद्र हेलचल यांनी सहाय्य केले.