लोकसभेची देशात सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाने काही दिवसापूर्वी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये शिंदे गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती, पाटील यांनी प्रचारही सुरू केला होता. पण, आता आठवड्याभरातच त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. पाटील यांच्याऐवढी आता शिंदे गटाने बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली. अर्ज भरण्याची मुदत आज ४ एप्रिल शेवटची आहे. त्याआधीच उमेदवारी मागे घेण्यात आली, यामुळे आता शिंदे गटात हेमंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौतचा हल्लाबोल
"माझी भावना अशी आहे की, पहिली उमेदवारी जाहीर करायला नको होती. पण पक्षाने उमेदवारी जाहीर केली. आम्ही एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत. पक्ष श्रेष्ठांच्या काही अडचणी असतात. तीन पक्षांचे सरकार आहे. तडजोडी कराव्या लागतात असं त्यांनी मला सांगितलं. मला वाईट तर वाटतंच. पण, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं हेमंत पाटील म्हणाले.
"योग्यवेळ आल्यावर जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन. त्यांनी माझ्या पत्नीला यवतमाळमधून उमेदवारीबाबत सांगितलं आहे. पण, याबाबत आम्ही आमच्या परिवारात चर्चा केलेली नाही.आम्ही एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घेणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, असंही शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका
आज आमदार आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. "आपण पाहिलं असेल की ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं, उद्धव साहेबांनी बनवलं. त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्यांना पाच वेळा खासदार बनवलं आणि आज त्यांना दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट नाही मिळालं", असा टोलाही ठाकरेंनी भावना गवळी यांना लगावला.