हिंगोली : एकीकडे आंदोलने व इतर शेकडो गुन्हे दाखल असल्याचे सांगतानाच वसमत येथे मिरवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने तो मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारून हाय व्होल्टेज ड्रामा करण्यात आला.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर खा.हेमंत पाटील, आ.संतोष बांगर, जि.प.अध्यक्ष गणाजी बेले व इतर मंडळी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकली. या ठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पाच ते दहा जणांचेच शिष्टमंडळ आत जावू देणार असल्याचे सांगितल्यानंतर आम्ही परत जायचे काय? असा सवाल पाटील यांनी केला. त्यानंतर पुन्हा सर्वांना समोर जावू दिले. मात्र शंभर ते दीडशे जणांसाठी केबिनमध्ये जागाच नसल्याचे सांगून पुन्हा अर्ध्यांना अडविले असता सगळेजण पायऱ्यांवर जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करून भेटतही नसल्याचा आरोप केला. त्यानंतर स्वत: पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर हे शिष्टमंडळास भेटण्यास बाहेर आले. त्यांच्यासमवेत पुन्हा सगळाच लवाजमा आत गेला. मात्र खा.हेमंत पाटील व आ.संतोष बांगर हेच आत चर्चेसाठी गेले अन् पुन्हा शिवसैनिकांना बाहेरच ताटकळावे लागले. त्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा नेमका कशासाठी? हे शेवटपर्यंत कळालेच नाही.
मटका, बेटिंगवर चकार शब्दही नाहीखरेतर जिल्ह्यात मटका, बेटिंग व इतर अवैध धंदेही जोमात आहेत. खासदारांवरील किरकोळ गुन्ह्यापेक्षा या प्रश्नांवरून पोलीस प्रशासनास धारेवर धरले असते. तर जनतेला अधिक भावले असते. भलेही राजकारण करायचे असले तरीही त्यातूनही हा विषय मांडणे शक्य होते. मात्र त्यावर चर्चाही झाली नाही.
जयप्रकाश मुंदडा गद्दार; उद्धव ठाकरेंना भेटून त्यांना धडा शिकवू : खा. हेमंत पाटील