औंढा नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत सेनेची बाजी; विजयमाला मुळे यांचा दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 05:53 PM2019-12-27T17:53:45+5:302019-12-27T17:56:23+5:30
भाजपने नगरसेवकांची पळावापळवी करूनही सेनेने हा विजय साकारला.
औंढा नागनाथ : येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. नगराध्यक्षा म्हणून विजयमाला राम मुळे ह्या ९ विरुद्ध ६ अशा फरकाने निवडून आल्या. विशेष म्हणजे भाजपने नगरसेवकांची पळावापळवी करूनही सेनेने हा विजय साकारला. यावेळी काँग्रेसच्या २ नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने मतदान केले तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. काँगेसच्या तीन नगरसेवकांनी मात्र सेनेच्या उमेदवारास पाठींबा दिला.
नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनाकडून विजयमाला राम मुळे तर भाजपाकडून सिताताई राम नागरे यांनी अर्ज भरला होता. या निवडीचे पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी सहायक अधीकारी सचिन जोशी होते. यावेळी सभागृहामध्ये हात उंच करुन मतदान घेण्यात आले. त्यामध्ये विजयमाला मुळे यांना ९ मते पडली. तर भाजपाच्या सिताताई नागरे यांना ६ मते पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक शकील मुजावर व जकी काजी हे तटस्थ राहिले. औंढा नागनाथ येथील नगरपंचायतीमध्ये शिवसेना ५, काँग्रेस ५, भाजपा ४, राष्ट्रवादी २ तर एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.