हिंगोली : गोरक्षणाच्या नावाखाली जनावरांच्या विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळा चालकावर अखेर २४ ऑगस्ट रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाला आहे. या गोशाळेतील गायब झालेली जनावरे थेट कत्तलखान्यात गेली आहेत की, शेतकऱ्यांना विकली याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.
कत्तलखान्याकडे १८ जनावरे घेऊन जाणारे एक वाहन वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी २८ जुलै रोजी पकडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी तथा जनावरांचा मालक शेख अब्दुल शफी शेख अब्दुल मदार कुरेशी रा.परभणी याच्या ताब्यातून ३ लाख ६ हजार रुपये किंमतीची १६ गोऱ्हे आणि २ बैल पोलिसांनी जप्त करून ते सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोपाल गोशाळेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर बैलांचे मालक शेख अब्दुल शफी शेख अब्दुल मदार कुरेशी यांनी औंढा नागनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायलयात अर्ज दाखल करून, बैलांचा ताबा देण्याची विनंती केली होती.
न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी बैल ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानंतर बैलांचे मालक शेख अब्दुल शफी हे हत्ता नाईक येथील गोशाळेत बैलांचा ताबा घेण्यासाठी गेले. परंतु त्याठिकाणी केवळ दोनच बैल आढळून आले आणि उर्वरित बैलांचा अद्यापपर्यंत कुठेही थांगपत्ता लागला नाही. मालक शेख अब्दुल शफी यांनी अनेकवेळा गोशाळेत जावून गोशाळा चालक शिवाजी गडदे महाराज याला भेटण्याचा आणि बैलांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बैलही मिळाले नाही आणि महाराजही सापडले नाही. त्यामुळे बैलांच्या ताब्यासाठी मालकाने हिंगोली पोलीस अधीक्षकांना अर्ज देवून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीची मागणीही २१ ऑगस्ट रोजी केली होती.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या प्रकरणात लक्ष घालून ४८ तासांत बैल न मिळाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. आणि याबाबत हट्टा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बबन राठोड यांच्या फियार्दीवरून आरोपी शिवाजी गडदे महाराज (गोपाल गोरखनाथ आदिवासी सेवाभावी संस्था) याच्याविरुद्ध विश्वासघात करून मालमत्तेचा अपहार करणे किंवा स्वत:साठी वापरणे यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ४०३, ४०६ नुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.