हिंगोली : येथील एका इसमाचा मृत्यू सौदी अरेबियात झाला असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंगोलीत झाल्याचे दाखविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीत मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या माजी नगरसेवकाविरूद्ध अखेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि. १२ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोलीतील तोफखाना येथील मो. हुसेन मींया आ. गफुर तांबे हे मक्काह ( सौदी अरेबिया) येथे गेले होते. १८ जानेवारी २००६ रोजी त्यांचा मृत्यू मक्काह सौदी अरेबियातच झाला होता. परंतु, माजी नगरसेवक शेख मुन्तजीम शेख मौला याने हिंगोली नगरपरिषदेतून २१ जानेवारी २००६ रोजी बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी नोंद करून संबंधित मयत इसमाचा मृत्यू हिंगोलीतच झाला असे भासवून बनावट प्रमाणपत्र मिळविले होते.
सदर बाब उघडकीस आल्याने याप्रकरणी नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हिंगोली नगरपरिषदेचे लिपीक संदीप घुगे यांनी हिंगोली शहर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून बनावट कागपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केल्याने माजी नगरसेवक शेख मुन्तजीम शेख मौला याच्याविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४७१, ३१ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि केनेकर हे करीत आहेत.