हिंगोली : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथील संतोष वाठोरे (वय ३0) हा युवकही याच समस्येमुळे नैराश्येच्या गर्तेत सापडला. त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा केलेला प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात यश आले.
संतोष वाठोरे हा मागील दोन-तीन दिवसांपासून मानसिक तणावात होता. एकतर रोजगार हिरावला अन् त्यात कौटुंबिक वाद. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलण्याची मानसिक तयारी केली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिवसांब घेवारे म्हणाले, लागलीच दखल घेत कार्यवाही केल्याने या तरुणाचा प्राण वाचला. लोकांनीही मदत केली. हे आमचे पोलीस दलाचे कामच आहे. वेगळे काही केले नाही. मात्र त्या युवकाची अडचण जाणून घेवून त्याचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न राहील. प्रत्येकाने सतर्क राहून आपल्या संपर्कातील लोकांचे बदल टिपले तर असे अनुचित प्रकार टाळता येतात.
तत्परतेमुळे वाचला जीवसंतोष वाठोरे याने बुधवारी सकाळी फेसबुकवर ‘सॉरी मित्रांनो, आता सर्व काही संपलं’, असा मेसेज टाकला. फेसबुक लाईव्ह करताना त्याला अश्रू आवरत नव्हते. दरम्यान, त्याच्या फेसबुक मित्र असलेल्या मनीष खरात यांनी त्याला फेसबुकवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही नाही हो सर, आता सर्व काही जे आहे, ते फेसबुक लाईव्हमध्ये थोड्या वेळात बघा’, असे तो म्हणाला. खरात यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिवसांब घेवारे यांच्या कानावर ही बाब घातली.
पंधरा मिनिटांत लागला शोधघेवारे यांनीही गांभीर्य ओळखून लागलीच या युवकाचे लोकेशन ट्रेस केले. ते कुठे आहे, हे सांगून त्याच्या काही मित्रांना, गावातील इतरांनाही फोन करून त्याचा शोध घेण्यास सांगितले. पोलीस पथकही पाठविले. अवघ्या पंधरा मिनिटांत संतोषचा शोध लागला. तो परिसरातील शेतशिवारात असल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकही तेथे धडकले. संतोषला त्यांनी घरी नेले. घेवारे यांच्या तत्परतेमुळे संतोष वाठोरे यांचा जीव वाचला. पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.