वसमत (हिंगोली): विचारलेली माहिती का देत नाही ? या कारणावरून कार्यकारी अभियंत्यास मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी शहरातील पूर्णा पाटबंधारे विभाग कार्यालयात घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर प्रकरण निवळले.
शहरातील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता बिराजदार हे कार्यालयात होते. यावेळी एकजण त्यांच्या दालनात दाखल झाला. आम्ही विचारलेली माहिती का देत नाही असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली. तसेच अचानक अभियंता बिराजदार यांच्यावर हल्ला केला.
दरम्यान, माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर, केशव गारोळे, इमरान कादरी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण निवळले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.