हिंगोली : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील आयुध विभागात शस्त्र दुरूस्तीचे काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने हनुवटीखाली गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना २० जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
हिंगोली येथील आयुध विभागातील शस्त्र दुरूस्तीचे काम करणारे पोना जितेंद्र गोकूळदास साळी हे २००१ मध्ये पोलीस दलात रूजू झाले होते. सध्या ते पोलीस मुख्यालयातील आयुध विभागात शस्त्र दुरूस्तीचे काम पाहात होते. रोज चार जणांना या विभागात कामाला बोलावले जाते. सकाळच्या सत्रात काम केल्यानंतर ते घरी गेले. पुन्हा दुपारी ४ वाजता त्यांची ड्यूटी होती. मात्र ते ३ वाजताच या विभागात दाखल झाले. शस्त्र कार्यशाळेत ते एकटेच असताना त्यांनी हनुवटीजवळ खालच्या भागाजवळ बंदुक लावून गोळी झाडल्याने ती डोक्यातून आरपार गेली.
बंदुकीच्या फायरचा आवाज ऐकताच आजूबाजूची कर्मचारी घटनास्थळी धावली. तेव्हा प्रकार समोर आला. साळी हे जागीच मृत्यू झाले होते. याठिकाणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प. उपाधीक्षक आश्विनी जगताप यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस ठाण्याचे केनेकर व इतरांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. मयत जितेंद्र साळी यांना गायकीचा छंद होता. ते मूळचे कळमनुरी तालुक्यातील असले तरी, येथील नवीन पोलीस वसाहतीत कुटूंबियासह वास्तव्याला होते. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे त्यांचे कुटूंब आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्टचसाळी यांच्या आत्महत्येमागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. पोलीस तपासात ते समोर येईल. मात्र ते ज्या २००१ च्या बॅचमधून निवडले होते त्या लोकांच्या व्हॉटस्अप गु्रपवर त्यांनी आज सकाळी एक संदेश टाकला होता. माझ्या कुटूंबियांना मदत करा हो असे त्यात म्हटले होते. ते मागील काही दिवसांपासून नैराश्यात होते असे निकटवर्तीयांनी सांगितले.