कौठा ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील बोराळा येथील आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सलग तिसऱ्या दिवशीही एका तरुणाच्या आत्महत्येची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीनही घटना या वेगवेगळ्या कारणांनी घडल्या. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
बोराळा येथे ९ , १०, व ११ आॅक्टोबर रोजी सलग तिघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने हे गाव चर्चेत आले आहे. ९ आॅक्टोबर रोजी प्रभाकर जाधव यांनी आत्महत्या केली. तर १० आॅक्टोबर रोजी येथील संतोष खराटे या युवकाने आत्महत्या केली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच सलग तिसऱ्या दिवशी ११ आॅक्टोबर रोजीही रात्रीला येथील राजू बाबुराव गंगतिरे वय २४ वर्षे या युवकाने गळफास घेऊनच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ९ :३० च्या पूर्वी रोड लगतच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. प्रकाश गंगतिरे यांच्या खबरी वरून वसमत ग्रामीण ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.
अतिपावसांमुळे शेताचे अतोनात नुकसान झाल्याने या विवंचनेतून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आलेली आहे. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास सपोनि बी.आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. सलग तीन दिवसांत तीन जणांनी विशेषत: तिन्ही युवकांनी आपले जीवन संपवल्याने बोराळा गावावर दु:खाचे सावट निर्माण झाले आहे.
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आत्महत्या बोराळा येथील प्रभाकर जाधव (३२) यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून राहत्या घरी ९ आॅक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेत बोराळा येथील संतोष बालाजी खराटे (२२) याने १० आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, धमक्यांच्या त्रासाला कंटाळूनच संतोषने आत्महत्या केली, असा आरोप मयताची आई कांताबाई यांनी केला आहे. या घटनेबाबत मयताची आई कांताबाई खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बोराळा येथील बाजीराव जाधव,अण्णा जाधव, शिवाजी जाधव, तातेराव जाधव (सर्व रा. बोराळा) यांनी संगनमत करून मयताच्या आई कांताबाई यांनी शेतावर दावा का केला, म्हणून फिर्यादीच्या मुलास धमक्या दिल्या. त्यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळूनच संतोषने आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, भुजंग कोकरे, बालाजी मिरासे, भुरके यांनी भेट देऊन पंचनामा केला.