गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव यात्रा महोत्सवाचे पोलीस प्रशासनाला गांभीर्य राहिले नसून पोलीस बंदोबस्ताअभावी यात्रेचीसुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्ती, चोरट्यांचे फावले जात असून १२ जानेवारीच्या रात्री यात्रेत सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.१२ जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी यात्रेत सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यात चार कटलरी खेळणी दुकानाच्या समोरील कापड बेल्डने कापून चोरीचा प्रयत्न झाला. तर प्रकाश वामनराव कावरखे यांचे किराणा दुकान फोडून ४५०० रुपयाचा तर शेख रसूल शेख हमीद यांची कटलरी खेळणी दुकानाच्या कापडी पाल कापून २१०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. गोरेगाव पोलीस ठाण्याचा कारभार पंधरवाड्यापासून प्रभारीवर असल्याने ठाणे हद्दीत सर्वकाही अलबेल चित्र पहावयास मिळत आहे. गोरेगाव येथील ग्रामदैवत गोरेश्वर, शिव मंदिर आणि सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले प.पू. पाचपीर बाबा दर्गाह यांच्या उरुसाच्या यात्रेला २९ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन अपेक्षीत असताना मात्र यावर्षी तसे दिसत नाही. यात्रेनिमित्त ठाण्यात शांतता समितीची बैठकीही घेतली नाही. एकही अतिरिक्त कर्मचाºयांची मागणी केली नाही. यात्रेत केवळ एक तंबू उभारला असून तेथे बिनतारी संदेश यंत्रणा व कर्मचारी हजर राहत नसल्याचे यात्रेकरू सांगत होते. परिणामी यात्रेत गर्दीतून दुचाकी दामटत टवाळखोरांनी उच्छांद मांडला आहे. त्यामुळे यात्रेकरू महिला व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यात्रेत रात्री मनोरंजनाच्या नावाखाली आलेल्या खुल्या तमाशाकडून सर्व नियमांना ढाब्यावर ठेवून रात्री ३ ते ४ वाजेपर्यंत मोठ्या कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर डान्स सुरू असतो. त्यात पोलीसांचा धाकच उरला नसल्याने त्यांना अभय मिळत आहे. यात्रेत अवैध दारूविक्री होत आहे. शिवाय हाणामारीच्या घटनाही घडत आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.विशेष म्हणजे याबाबत संबधित ठाणे प्रभारी पोलीस अधिका-यास दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसादच दिला नाही.
गोरेगाव यात्रेतील दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:52 AM