हिंगोली : बारा ज्योतीर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नगरीत श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी मध्यरात्रीपासूनच रांग लावली होती. मध्यरात्री २ वाजता शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. बम..बम..भोले, हर..हर...महादेवांच्या गजराने औंढानगरी दुमदुमली आहे.
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि याच दिवशी नागपंचमी आल्यामुळे आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. मराठवाड्यासह राज्यभरातील भाविक रविवारी रात्रीपासून औंढ्यात दाखल होत होते. मध्यरात्री २ वाजता तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानचे कर्मचारी, स्वयंसेवकही पुढाकार घेत आहेत.भाविकांची संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी औंढा येथे भेट देवून सुरक्षेचा आढावा घेतला. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांस राज्य राखीव दलाची तुकडी, एटीएस पथक, श्वान पथकासह होमगार्ड असा एकूण ३५० जवान तैनात करण्यात आल्याची माहिती औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांनी दिली.
सकाळी ११ वाजेपर्यंत ३० हजार भाविकांनी घेतले दर्शन...शासकीय महापूजेनंतर मध्यरात्री २ च्या सुमारास भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. तोपर्यंत भाविकांची मोठी रांग लागली होती. सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ३० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. भाविकांची रांग कायम असून, दिवसभरात जवळपास एक लाख भाविक नागनाथाचे दर्शन घेतली असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.