सेनगाव (हिंगोली ) : दुचाकीवर बहिणीच्या लग्नपत्रिका वाटप करणाऱ्या भावडांवर पूर्व वैमनस्यातून अंगावर टिप्पर घातल्याची घटना आज दुपारी घडली. या थरारक घटनेत एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सुभाष अर्जुन देवकर असे मृताचे नाव असून टिपर चालकाने पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले आहे.
तालुक्यातील वटकळी येथील येल्लापा अर्जुन देवकर (३५ ) व शिवाजी किसन संत (३२) यांच्यात जुने वाद आहेत. येल्लापाने वर्षभरापूर्वी शिवाजी याचा भाऊ सुरेश यास चाकूने भोसकून जखमी केले होते. वर्षभरानंतर सुरेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर येल्लापा लोणी येथे स्थलांतरित झाला. येत्या १९ तारखेला येल्लापाच्या बहिणीचे लग्न आहे. यासाठी लग्नपत्रिका वाटण्यासाठी तो सुभाष (२५ ) या भावासोबत दुचाकीवरून सेनगावकडे दुपारी १२ वाजेच्या सुमारास येत होता.याचा सुगावा लागताच शिवाजीने टिप्परच्या ( एम.एच.३८ एक्स.०९६६) सहाय्याने पाठलाग सुरु केला.
सेनगावनजीक सुकळी पाटी येथे येल्लापा आणि सुरेश आले असता शिवाजीने भरधाव टिप्पर त्यांच्यावर घातले. यात दुचाकी चालक सुभाष जागीच ठार झाला तर येल्लापा गंभीर जखमी आहे. यानंतर शिवाजी थेट सेनगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर, फौजदार बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरु आहे.